‘जैत रे जैत’ : आदिवासी जीवनाचा आत्मा स्पर्शून जाणारी कथा
कर्नाळा जिल्यातील ठाकूरवाडी येथील आदिवासींच्या जीवनावर आधारित गो. नी. दांडेकर यांची ही कालातीत कथा. या कथेवर आधारित चित्रपटाची निर्मिती दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांनी केली असून, संगीत दिग्गज हृदयनाथ मंगेशकर यांनी दिले आहे. चित्रपटातील गाणी आजही तितकीच ताजी, तितकीच मनाला भिडणारी — खऱ्या अर्थाने अजरामर.
हा चित्रपट आपल्याला निसर्गाच्या, आदिवासी संस्कृतीच्या आणि त्यांच्या जगण्याच्या फार जवळ नेतो. साध्या, सरळ आणि निसर्गाशी अतूट नातं असलेल्या लोकांच्या जगण्याचे जिवंत चित्रपटपटावर दर्शन घडते.
नाग्या भगत – निरागस, भोळा पण हट्टी!
नाग्या हा अत्यंत साधा, निरागस तर कधी हट्टी असा भाबडा माणूस. झाडाची फांदी तोडताना मधमाशी चावल्यानंतर तो बदला घेण्यासाठी मधमाश्यांची पोळी नष्ट करायचा निश्चय करतो. वडिलांचं वाक्य त्याच्या मनात घर करून असतं —
“कोणाच्या वाटेला जाऊ नको, पण कोणी वाटे गेलं तर त्याला सोडू नको!”
हेच तत्त्व तो मधमाशींसाठीही वापरतो. लहानपणापासून त्याला राणी माशी पाहायची असते. देव पाहण्यासाठी पुण्य कमवायचं या श्रद्धेने तो व्रत धरतो. पण श्रद्धेला धक्का बसला की मन बिथरतं — म्हणूनच तो राणी माशीला अद्दल शिकवायचा निर्णय घेतो. असा हा भाबडा, सरळ नाग्या भगत.
चिंधी – विद्रोही, स्वाभिमानी आणि प्रेमासाठी जीव देणारी स्त्री
चिंधी ही फक्त ‘पदरी पडलं अन् पवित्र झालं’ असं म्हणून मुकाटपणे जगणारी स्त्री नाही। ती विद्रोही, स्वाभिमानी, कष्टाळू आणि खंबीर आहे.
तिचं लग्न एका भित्र्या, निष्क्रिय माणसाशी झालेलं असतं, कारण तिच्या वडिलांनी तिला त्या माणसाला विकलेलं असतं. पण चिंधीला हा नवरा मान्य नसतो. ती लाकडाच्या मोळ्या विकून पैसे कमावते, ते त्याला परत करते आणि काडीमोड घेते.
तिचं मन तर नाग्याच्या प्रेमात आधीच हरवलेलं असतं. ढोल वाजवणाऱ्या नाग्याकडे बघताक्षणी तिला तिचं जग सापडतं.
ती नाग्याच्या प्रत्येक पावलावर सोबत उभी राहते — मधमाश्यांची पोळी तोडताना असो, वाडीत तिच्या नवऱ्याची बाजू मांडताना असो, किंवा सासूला आधार देताना असो.
जीव माश्यांनी चावून चावून निघून जात असतानाही, शेवटच्या क्षणी ती नाग्याला सांगते — “राणी माशी उडून गेली… तू जिंकलास!” आणि शांतपणे प्राण सोडते।
अशी आहे चिंधी — प्रेमासाठी पूर्णतः झोकून देणारी.
आदिवासी संस्कृतीचे जिवंत दर्शन
चित्रपटात आदिवासींचे दैनंदिन जगणे अतिशय सुंदर आणि मूळस्वरूपात दाखवले आहे — त्यांचं निसर्गावरचं अवलंबित्व, रितीभाती, श्रद्धा–अंधश्रद्धा, उंदीर, मोर, कावळे खाण्याची जीवनपद्धती — सर्वकाही वास्तव दाखवलेले.
हा चित्रपट आदिवासी संस्कृतीचा आत्मा जपतो.
अजरामर संगीत
गाणी म्हणजे —
- ना. धो. महानोर यांचे शब्द,
- लता मंगेशकर, आशा भोसले, उषा मंगेशकर, रविंद्र यांच्या आवाजातले सूर,
- आणि हृदयनाथ मंगेशकर यांचं संगीत…
फक्त अप्रतिम! आजही हे सूर मनाला भिडतात.