उंबरठा (Umbartha) – एक सशक्त मराठी क्लासिक
Home  ∣  Uncategorized   ∣   उंबरठा (Umbartha) – एक सशक्त मराठी क्लासिक

प्रत्येक वयाच्या टप्यावर चित्रपट वेगळे दिसतात.आज असाच 'उंबरठा 'बघितला.आजही तो तितकाच महत्वाचा वाटला. मराठी मधे सामाजिक आशयावर चित्रपट बनवण्याचा तो काळ. आताही बनत आहेतच पण तेव्हाचे ते सिनेमे मनावर अजून ही तेवढेच कोरून राहिले आहेत.अजून ही आपला अभिजातपणा टिकवून आहेत. जब्बार पटेल दिग्दर्शित शांता मिसाळ यांच्या बेघर या कांदबरी वर आधारित असलेल्या चित्रपटाच पटकथा लेखन ज्येष्ठ लेखक विजय तेंडुलकरांनी यांनी केलं आहे.

चित्रपटाला चाळीस वर्ष होऊन गेलीत तरीही आपल्या पुढे तेच प्रश्न उभे राहतात खरंच लहान मुलीला किंवा घराला सोडून जाऊन सुलभाला नोकरी करण्याची गरज होती? तसं पाहिलं तर घरी राहून पण तिला दुसरी नोकरी शक्य होती. तिचं सगळ सोडून पुढे जाण ...एक बायको एक आई एक सून म्हणून योग्य नाही असं आजही आपल्याला वाटत राहत. तिला उंबरठा ओलांडायची खरंच गरज होती ? असे आज ही प्रश्न पडतात.

चित्रपटाच थोडक्यात कथानक, सुलभा महाजन ( स्मिता पाटील) एक उच्चभ्रू कुटुंबातील विवाहित तरुणी लग्नानंतरच आपल्या नवऱ्याच्या,(गिरीश कर्नाड) जावेच्या (आशालता) सहकार्याने MSW सामाजिक कामाची शिक्षण घेते. पण घरी आल्यानंतर आपल्या मनासारखं काही कामच नाही हे शल्य तिच्या मनात असते. खरं तर घरी सासूबाई आधीपासून च सामाजिक संस्थांची काम करतच असतात अशा परिस्थितीत त्या देखील तिला समजावतात की ,आपल्या घरच्या संस्थामध्येच तू काम कर. पण ती संधी नाकारून सुलभा महिलां आश्रमातील superitantan नोकरी स्वीकारते आणि घरचा उंबरठा ओलांडते. आश्रमातील असणारा ढिसाळ कारभाराला ती एक प्रकारची उत्तम शिस्त आणते. आश्रमात तिला अनेक अवघड प्रसंग येतात पण ती निर्भिडपणे सामोरी जाते.आश्रमाला शिस्त आणते. तिथल्या महिलांना समजून घेते. त्यांची आयुष्य सावरण्याचा प्रयत्न करते. चित्रपटामध्ये अनेक सामाजिक प्रश्न उभे केल्याच आपल्याला जाणवत महिलांचं पुनर्वसन, पुनर्विवाह, अगदी लेस्बिअन संबंध सुद्धा दाखवण्यात आला आहे.पण त्या काळाच्या समजुतीप्रमाणे त्यावर उपाय म्हणजे समुपदेशन अस सांगितलं गेल आहे.
चित्रपट पुढे सरकताना आश्रमात आणखी दुर्घटना घडतात याचे आरोप ही सुलभवर केलेजातात पण या आरोपांना निर्भिडपणे सामोरी जाऊन सुलभा राजीनामा देते.आणि घरी येते. घरी आल्यावर चा पहिला प्रसंग तिची मुलगी तिच्याकडे न जाता काकू काकू म्हणत निघून जाते. तिला अनेक गोष्टी बदल्याच जाणवत. ती नव्हती तेव्हा एका महिला सहकारीशी शारीरिक संबंध आल्याचं सुभाष सुलभाला अगदी प्रामाणिकपणे सांगतो. आणि तजोडीची अपेक्षा ही करतो कारण ज्या वेळी त्याची किंवा घरातल्याची इच्छा नसताना तिने घेतलेल्या निर्णयात त्याने पाठिंबा देऊन तडजोड केली ली असते तशी तर ही बाब एक छोटी गोष्ट आहे तू ही एक तडजोड कर अस सांगतो. पण हे ऐकून मनाने कित्येक कोस दूर गेलेली सुलभा घराला तरी आपली कुठे गरज आहे..हा विचार करून परत एकदा उंबरठा ओलांडते. एक पुरुष म्हणून होणारी तगमग गिरीश कर्नाड यांनी उत्तम रंगवली आहे. उंबरठ्याचा शेवट अनेक जणांना आजही आवडत नाही. पण तेंडुलकरांनी हा शेवट केला नव्हता तेंडुलकरांची सुलभा परत येऊन संसार करते आणि त्याचा संसार उत्तम चालतो. पण जब्बार पटेलांचा अट्टाहास होता की, सुलभाने घर सोडलं पाहिजे.

एका मुलाखती मध्ये स्मिता पाटील या जब्बार यांच्या अट्टाहासच समर्थन करताना म्हणतात, आपल्याकडे एखादा पुरुष घर सोडतो तेव्हा त्याच्या मागे त्याची बायको, मूल जातात पण एखादी बाई घर सोडते तेव्हा तिच्या मागे कोणी जात नाही.जेव्हा फ्रान्स फेस्टिवल मध्ये उंबरठा दाखवण्यात आला तेव्हा तिथल्या बायकांनी स्मिता यांना प्रतिक्रिया दिल्या की, नवरा आणि मुल सोडून जाणाऱ्या बाईला तिथे ही वाईट च म्हटलं जातं. स्मिता म्हणतात कमीअधिक प्रमाणात सगळीकडे बाईची अवस्था तशीच आहे. उंबरठ्याचा शेवट अनेकांना आवडला नाही यावर स्मिता पाटील म्हणतात,सर्वसामान्यांचं जे असतं ते स्पष्ट असतं, तसं विचारवंतांचं नसतं. त्यांना उंबरठ्याचा शेवट कुठपर्यंत आवडेल? जोपर्यंत त्यांची स्वतःची बायको उंबरठा ओलांडून जात नाही तोपर्यंतच!

'उंबरठा'ची पटकथा लिहिताना तेंडुलकरांच्या डोळ्यासमोर स्मिता पाटील नव्हत्या. तर दीप्ती नवल होत्या.जब्बार पटेल मुलाखतीत सांगतात- "माझ्या डोक्यामध्ये उंबरठामधील मुख्य पात्रासाठी एक आंतरिक शक्ती असणारी, जिचा चेहरा बोलका आणि देहबोलीचं भान ठेवणारी अशी फक्त एकच व्यक्ती होती आणि ती म्हणजे, स्मिता पाटील"
जेव्हा तेंडुलकरांनी स्मिता चा अभिनय बघितला तेव्हा ते म्हणाले, "मी ज्या सुलभा महाजनची कल्पना केली, ती तू जवळजवळ साक्षात जगली आहेस." हे ऐकल्यावर स्मिताचा बांध फुटला.