☘️वाटलेल्या डाळीची कोथिंबीर वडी ☘️
Home  ∣  पाककृती   ∣   ☘️वाटलेल्या डाळीची कोथिंबीर वडी ☘️

☘️वाटलेल्या डाळीची कोथिंबीर वडी ☘️

पूर्वी आई म्हणायची पुना,मुंबई च्या बायकांचा स्वयंपाक खूप चविष्ट बनत असेल ना!🤔कारण त्याना कोथिंबीर, हिरवी मिरची, टोमेटो बारा महिने उपलब्ध असतात. तुलनेने ग्रामीण भागात ह्या गोष्टी बारा महिने नाही मिळत. हे सगळं अगदी सीझन असेल तेव्हा मुबलक आणि ताज मिळत .
मला आठवत कोथिंबीर खूप असायची शेतात पण फक्त हिवाळ्यात . तालुक्याच्या बाजारातही पूर्वी कोथिंबीर हिवाळ्यात असायची. त्यामुळे तेव्हा कोथिंबीर वडी ही फक्त हिवाळ्यात च होत होती. आता कोथिंबीर बारा महिने मिळते फक्त महाग आणि स्वस्त हा फरक झाला आहे. कोथिंबीर, हिरवी मिरची,ओल खोबर,पुदिना ,आल 🫚हे आज ही मला खूप आकर्षक वाटतात. हे सगळं असेल तर सुकलेल्या कडधान्याना पण चव येते.
घरी दोन प्रकारच्या कोथिंबीर वड्या बनत होत्या एक म्हणजे बेसन (हरभरा) पीठ आणि हरभरा डाळ भिजवून केलेली. अर्थात या वड्या मिरची पावडर किंवा हिरवी मिरची घालून केल्या जातात.
माझ्या मते पीठ घालून केलेल्या वड्या पेक्षा हरभरा डाळ भिजवून केलेल्या वड्या चविष्ट😋 लागतात.

साहित्य:
• हरभरा डाळ – 1 कप
• बारीक चिरलेली कोथिंबीर – ३ कप
• हिरवी मिरची – स्वादानुसार
• आल – 1 इंच तुकडा (बारीक किसलेला)
• हळद – ¼ चमचा
• ओवा-१/२ चमचा
• मीठ – चवीनुसार
• लसूण-५-६ पाकळ्या
• तेल – तळण्यासाठी
• तीळ

कृती:
1. डाळ भिजवणे
• हरभरा डाळ ५-६ तास किंवा रात्रीभर भिजवून ठेवा.
• नंतर चांगली मिक्सरमध्ये वाटून गुळगुळीत पेस्ट तयार करा.
2. मिश्रण तयार करणे
• वाटलेल्या डाळीत हळद, , मीठ, हिरवी मिरची-आल - लसूण पेस्ट , ओवा एकत्र मिक्स करा. आता मिश्रणात कोथिंबीर घालून एकत्र करा.
• मिश्रण जरा घट्ट असावे, म्हणजे वडी तळताना तुटणार नाही.
3. हे मिश्रण एका पसरट भांड्यात पसरवून वरून तीळ टाकावे.
• वाफेवर शिजवून घ्यावे. थंड झाल्यावर वड्या कापाव्यात.
4. वड्या तळणे
• कढईत तेल गरम करा.
• मध्यम आचेवर वड्या सोनेरी रंग येईपर्यंत तळा.
• तेलातून काढून कागदावर ठेवून अतिरिक्त तेल शोषून घ्या.
5. सर्व्ह करणे
• गरम वड्या कोथिंबीर आणि पुदिना चटणी किंवा सॉस सोबत सर्व्ह कराव्यात

💡 टीप:
• वड्या जास्त तेल सोडून हलक्या करायच्या असतील तर एअर फ्रायर मध्ये 180°C वर 15-18 मिनिटे ठेवून तयार करता येतील.
• कोथिंबीर खूप असल्यास स्वाद अजून ताजगीपूर्ण आणि सुगंधित होतो.