कालच बाजारातून एक खलबत्ता
विकत आणला…
आनंदाच्या, दुःखाच्या, चिंतेच्या,
मान-अपमानाच्या, भीतीच्या, आत्मविश्वासाच्या,
कमजोरीच्या, ताकदीच्या, दुबळेपणाच्या,
पोसलेल्या अहंगंडाच्या—
सगळ्या भावनांना
आहे तेवढ्या ताकतीने
खलबत्त्यात चेचून चेचून
रस काढला…
एका स्वच्छ कपड्यात
तो गाळून घेतला…
उरलेला चोथा
निर्दयपणे फेकून दिला,
आणि वस्त्रगाळ काढा
एक-दोन घोटात
पिऊन टाकला…
ते दोन घोट
शुद्धीकरण झाल्याचा
एक क्षणिक भास देऊन गेले—
मन मात्र
अजूनही
तहानलेलंच होतं…